शहाड-मोहने रस्त्याला गॅरेज, वॉशिंग सेंटरचा विळखा; अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी?

लाखाच्या बिदागीच्या चर्चेने संशयाचे वातावरण; तक्रारींनंतरही कारवाईची प्रतीक्षा, सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्याकडून कारवाईचे आश्वासन

कल्याण : रोशन उबाळे

कल्याण पश्चिमेतील शहाड ते मोहने रस्त्यालगत गॅरेज, कार वॉशिंग सेंटर आणि विविध दुकानांचे अतिक्रमण वाढत असल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यालगतच्या मोकळ्या जागांवर अनधिकृत शेड आणि दुकाने उभारली जात असल्याच्या तक्रारी असून, यामुळे परिसराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित व्यावसायिकांवर ठोस कारवाई होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या अनधिकृत व्यवसायांना स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा आरोपही परिसरात केला जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्यालगत माऊली वॉशिंग सेंटर, रॉयल ऑटो गॅरेज, सावरिया सेठ कार वॉशिंग सेंटर, वीर वॉशिंग सेंटर, नूर पान शॉप यांसह अनेक व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. विमल पार्क इमारतीलगतही दुकाने उभारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रस्त्याच्या कडेला सुशोभीकरण करण्यात आले असतानाच, लगतच्या जागांवरील शेड आणि दुकानांमुळे परिसराच्या विद्रूपीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्त्यालगत वाहने उभी करून दुरुस्ती आणि वॉशिंगची कामे केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मोकळ्या जागांवर अशा प्रकारे बांधकामे उभारली जात असतील, तर त्यांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘लाखाच्या बिदागी’च्या चर्चेमुळे संशयाचे वातावरण

या परिसरातील अनधिकृत शेड आणि दुकानांच्या उभारणीमागे आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. स्थानिक नगरसेवक आणि शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे संबंधित व्यावसायिकांना पाठबळ असल्याचा आरोपही केला जात आहे. लाखाची बिदागी घेतली जात असल्याच्या चर्चेमुळे कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात असला, तरी या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित आर्थिक व्यवहारांची सत्यता तपासणे आणि अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेने पारदर्शक भूमिका स्पष्ट करणे आवश्यक ठरणार आहे.

पूर्वी कारवाई झाली नाही, आता प्रशासन काय करणार?

या बांधकामांबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तत्कालीन अधिकारी जयवंत चौधरी यांच्या कार्यकाळात अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांचे फावल्याची भावना व्यक्त होत आहे. आता विद्यमान प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्याकडून या प्रकरणात कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी संबंधित विषय गंभीर असल्याचे मान्य करत कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अनधिकृत दुकाने, सर्व्हिस सेंटर, वॉशिंग सेंटर आणि गॅरेजविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यावसायिकांमध्येही चिंता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

आता शहाड-मोहने रस्त्यालगतची अतिक्रमणे प्रत्यक्ष हटवली जातात का, तक्रारींची निष्पक्ष चौकशी होते का आणि संबंधितांना अभय देणाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केवळ आश्वासनांपुरती कारवाई मर्यादित न राहता रस्त्यालगतच्या जागा मोकळ्या करून नागरिकांना सुरक्षितपणे चालता आणि प्रवास करता यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *