टिटवाळा , प्रतिनिधी : केडीएमसीच्या (अ) प्रभाग क्षेत्रातील वडवली हद्दीमधील शनिवार पाटील नगर, मोहोने येथे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कथित अनधिकृत बांधकामावर अखेर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई करत RCC फाऊंडेशन आणि जोत्याच्या काही भागावर निष्कासनाची कारवाई केली. मात्र, या कारवाईनंतरही मोठ्या प्रमाणात बांधकाम शिल्लक राहिल्याचा दावा स्थानिक तक्रारदारांनी केला असून, उर्वरित बांधकामावरही पूर्ण निष्कासन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शनिवार पाटील नगर, मोहोने येथील या बांधकामाबाबत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने तक्रारी आणि पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर महापालिका प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. कारवाईची पूर्वकल्पना नसल्याचे सांगत तक्रारदारांनी कारवाईची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
या पाहणीदरम्यान RCC फाऊंडेशन अर्थात जोत्याच्या काही भागावर कारवाई झाल्याचे दिसून आले. मात्र, तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, फाऊंडेशनचा अंदाजे 50 ते 60 टक्के भाग टक्के भाग अद्याप कायम असून, त्यावर उभारण्यात आलेले G+1 RCC बांधकामही शिल्लक आहे.
महापालिकेने अखेर कारवाईला सुरुवात केल्याबद्दल तक्रारदारांनी सहाय्यक आयुक्त राठोड आणि संबंधित प्रशासनाचे आभार मानले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयात प्रशासनाने प्रत्यक्ष पाऊल उचलणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मात्र, कारवाई अर्धवट न राहता ती पूर्णत्वास नेण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. उर्वरित RCC फाऊंडेशन तसेच त्यावरील संपूर्ण G+1 RCC बांधकाम नियमानुसार निष्कासित करून संबंधित जागा पूर्णपणे अनधिकृत बांधकाममुक्त करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक आरोप करण्याचा उद्देश नसून, महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामाबाबत सुरू केलेली कारवाई पूर्णपणे अंमलात यावी, एवढीच मागणी असल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात चंदाबाई नामदेव ढोणे, सुधाबाई पांडुरंग तिवारी आणि दत्ता पांडुरंग तरे, मोहोने यांनी प्रशासनाकडे उर्वरित बांधकामावरही पूर्ण निष्कासन कारवाई करण्याची मागणी केली आहे.












Leave a Reply