टिटवाळा, प्रतिनिधी : कल्याणजवळील बल्याणी परिसरात एका कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दोन देशी पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईत ठाणे गुन्हे शाखेच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रोशन गोंधळी आणि त्याचा साथीदार कृष्णा यादव या दोघांना अटक केली असून, जप्त करण्यात आलेली शस्त्रे नेमकी कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, याचा आता टिटवाळा पोलीस कसून तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, बल्याणी परिसरात रोशन गोंधळी याच्या कारमध्ये अवैध शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. या माहितीची खातरजमा करण्यासाठी एलसीबीच्या पथकाने सापळा रचून संबंधित कारची तपासणी केली. कारची झडती घेतली असता त्यामध्ये दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ ही शस्त्रे आणि काडतुसे जप्त केली.
या कारवाईनंतर पोलिसांनी रोशन गोंधळी आणि त्याचा साथीदार कृष्णा यादव या दोघांना ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी दोघांना टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, रोशन गोंधळी याचा परिसरात दबदबा असल्याचे सांगण्यात येत असून त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या कारमधून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमागे नेमका कोणाचा हात आहे आणि ती कोणत्या कारणासाठी आणण्यात आली होती, याबाबतचा तपास अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
जप्त करण्यात आलेली दोन देशी पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे आरोपींपर्यंत कोणी पोहोचविली, ती कोठून आणण्यात आली, त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता का, तसेच आरोपी एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या तयारीत होते का, या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणामागे आणखी काही आरोपी किंवा शस्त्रसाठ्याचे जाळे आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व डिवायएसपी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा प्रभारी अधिकारी मुकेश ढगे, पोलीस अधिकारी विशाल चोरगे यांसह टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपींच्या चौकशीतून या शस्त्रसाठ्यामागील उद्देश आणि त्यामागील संभाव्य गुन्हेगारी साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पहा व्हिडीओ :
https://www.youtube.com/watch?v=NMFxRGD8tmU














Leave a Reply