१५ ऑगस्टच्या तिरंगा बाईक रॅलीनंतर चार दिवस उलटूनही वाजपेयी चौकातील राष्ट्रध्वज कायम

 जनताहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे यांची  तिरंगे सन्मानपूर्वक काढण्याची मागणी
टिटवाळा : अजय शेलार 
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशप्रेमाचा जयघोष करत टिटवाळ्यात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन आणि दुचाकींवर राष्ट्रध्वज फडकवत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मात्र स्वातंत्र्यदिनाचा उत्साह ओसरून चार दिवस उलटून गेले तरी टिटवाळ्यातील वाजपेयी चौकात रॅलीसाठी लावण्यात आलेले अनेक तिरंगे अद्यापही तसेच असल्याचे चित्र १९ ऑगस्ट रोजी दिसून आले. विशेष म्हणजे, पावसातही हे राष्ट्रध्वज अशाच पद्धतीने लावून ठेवण्यात आल्याने राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
हा प्रकार जनताहित फाउंडेशनचे  संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रध्वज अशा पद्धतीने रस्त्यालगत, चौकातील रेलिंगवर आणि सर्कल परिसरात पावसात कायम ठेवणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन राष्ट्रध्वजाचा मान राखत ते सन्मानपूर्वक काढून सुरक्षित स्थळी ठेवावेत, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिरंगा बाईक रॅलीच्या निमित्ताने वाजपेयी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज लावण्यात आले होते. रॅली पार पडली, घोषणांचा आवाज थांबला आणि स्वातंत्र्यदिनाचा सोहळाही संपला. मात्र १९ ऑगस्ट रोजीही त्याच ठिकाणी अनेक तिरंगे वाऱ्यावर आणि पावसात फडकताना दिसत आहेत. रस्त्याच्या सर्कलवर आणि रेलिंगवर लावलेले हे राष्ट्रध्वज अद्याप काढण्यात आलेले नाहीत. हा परिसर वाहनांची मोठी वर्दळ असलेला असल्याने कार्यक्रमानंतरही राष्ट्रध्वज अशाच पद्धतीने दीर्घकाळ लावून ठेवणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचे आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याला सर्वोच्च सन्मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वज फडकावणे हा अभिमानाचा विषय असला, तरी कार्यक्रम संपल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने हाताळणी करणे, सन्मानपूर्वक काढणे आणि सुरक्षितपणे जतन करणे हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. देशप्रेम केवळ रॅली, घोषणा आणि छायाचित्रांपुरते मर्यादित न राहता राष्ट्रध्वजाचा प्रत्येक क्षणी सन्मान राखण्यातूनही दिसून आले पाहिजे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनानंतर चार दिवसांचा कालावधी उलटूनही राष्ट्रध्वज तसेच असल्याने कार्यक्रमाच्या नियोजनात कार्यक्रमानंतरची जबाबदारीही गांभीर्याने घेतली जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रध्वजाचा वापर करून कार्यक्रमाची शोभा वाढवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कार्यक्रम संपल्यानंतर त्याची सन्मानपूर्वक व्यवस्था करणेही आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर जनताहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे यांनी संबंधित विभाग आणि आयोजकांनी तातडीने पुढाकार घेऊन चौकातील राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक काढावेत आणि त्यांची योग्य प्रकारे सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. पावसामुळे राष्ट्रध्वजाच्या स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या बाबीकडे अधिक विलंब न करता गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यदिनाचा उत्सव संपला असला तरी तिरंग्याचा सन्मान करण्याची जबाबदारी संपत नाही. टिटवाळ्यातील हा प्रकार त्यामुळे केवळ झेंडे काढण्याचा प्रश्न राहिलेला नसून राष्ट्रध्वजाबद्दलची आपली जबाबदारी किती गांभीर्याने घेतली जाते, याचाही प्रश्न बनला आहे. संबंधितांनी याची तातडीने दखल घेऊन राष्ट्रध्वजाचा मान राखत योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *