म्हस्कळ गावाशेजारील आदिवासी पाड्यावर जनताहित फाउंडेशन ट्रस्टचा स्वातंत्र्यदिन; मुलांना खाऊ वाटप, मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
टिटवाळा 15 ऑगस्ट 2026 : अजय शेलार
देशभरात आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, कल्याण तालुक्यातील टिटवाळा जवळील म्हस्कळ गावाशेजारी असलेल्या घोडा खडकवाडी आदिवासी पाड्यावर जनताहित फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यदिन सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या वेळी लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. मात्र या आनंदाच्या वातावरणात पाड्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत समस्या समोर आल्याने उपस्थितांच्या मनाला चटका लावणारे वास्तव पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जनताहित फाउंडेशन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी म्हस्कळ गावाशेजारील या आदिवासी पाड्यातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी सर्वात गंभीर प्रश्न समोर आला तो म्हणजे पाण्याचा. आजही या वस्तीतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी तब्बल एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली. पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असताना स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आदिवासी कुटुंबांना पाण्यासाठी एवढी पायपीट करावी लागत असेल, तर विकासाच्या दाव्यांचा नेमका लाभ कोणापर्यंत पोहोचतो, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
इतकेच नव्हे तर या आदिवासी वस्तीपर्यंत आजही व्यवस्थित रस्ता नसल्याची समस्या समोर आली. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. शहरांमध्ये डिजिटल सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना, दुसरीकडे आपल्या राज्यातीलच काही नागरिकांना अजूनही पाणी आणि रस्त्यासारख्या प्राथमिक सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे.
“आपण म्हणतो भारत डिजिटल होत आहे; पण ज्या नागरिकांपर्यंत अजून पाणी आणि रस्ता पोहोचलेला नाही, त्या नागरिकांपर्यंत विकास कधी पोहोचणार?” असा सवाल जनताहित फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला.
आदिवासी महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणींबाबतही आपली व्यथा मांडली. काही महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळत नसल्याचे किंवा थांबल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन पात्र महिलांना योजनांचा लाभ वेळेत मिळतो आहे का, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला, तरी त्यांच्या कुटुंबांच्या जीवनातील प्रश्न मात्र गंभीर आहेत. पाणी, रस्ता, शासकीय योजनांचा लाभ आणि मूलभूत सुविधा या गोष्टींसाठी जर आजही नागरिकांना संघर्ष करावा लागत असेल, तर ‘विकसित भारत’ ही संकल्पना तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून मोठे काम करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
जनताहित फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने या पाड्यातील परिस्थितीची केवळ पाहणी न करता, नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश कांबळे यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजवंदन, भाषणे आणि उत्सवापुरता मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकाच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणण्याचा दिवस ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली श्वेता, तन्वी गणेश फनाडे, मोहिनी तानाजी मोकाशी आणि सपना अक्षय पंडागळे या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यानी देखील सहभाग घेतला.
स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे झाली; मात्र अजूनही एखाद्या आदिवासी कुटुंबाला पाण्यासाठी एक किलोमीटर चालावे लागत असेल, तर खरा विकासाचा अर्थ पुन्हा एकदा तपासण्याची वेळ आली आहे. शहरांचा विकास महत्त्वाचा आहेच; पण देशाचा खरा विकास तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा शेवटच्या वस्तीपर्यंत पाणी, रस्ता आणि मूलभूत सुविधा पोहोचतील. “खेडी आणि आदिवासी वस्ती कधी सुधारणार?” हा प्रश्न आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रशासनासमोर उभा राहिला आहे.














Leave a Reply