गोवेली ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट करा; अन्यथा श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाकडे जबाबदारी द्या : विजय (भाऊ) देशेकर

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे निवेदन; मल्टीस्पेशालिटी सुविधा, आयसीयू, तज्ज्ञ डॉक्टर व २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध करण्याची मागणी

टिटवाळा: कल्याण तालुक्यातील गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयाचे तातडीने आधुनिकीकरण करून ते अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज करण्यात यावे. अन्यथा हे रुग्णालय जनहितासाठी श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ, टिटवाळा यांच्या माध्यमातून चालविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष विजय (भाऊ) देशेकर यांनी मुख्यमंत्री आणि राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात देशेकर यांनी नमूद केले आहे की, गोवेली हे कल्याण तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून ते कल्याण–अहिल्यानगर (जुना अहमदनगर) महामार्गालगत आहे. तसेच मुरबाड तालुका, टिटवाळा आणि परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अत्यंत उपयुक्त ठरू शकते. मुरबाड महामार्गाचे काँक्रिटीकरण, पनवेल–जेएनपीटी–वडोदरा महामार्गाचा इंटरचेंज आणि भविष्यात समृद्धी महामार्गाशी होणारी जोडणी यामुळे या रुग्णालयाचे धोरणात्मक महत्त्व आणखी वाढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुमारे सात ते आठ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या ग्रामीण रुग्णालयाचा अपेक्षित प्रमाणात वापर होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्राथमिक आरोग्य सुविधांसाठीही अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून गंभीर रुग्णांना कल्याण, ठाणे किंवा मुंबई येथे उपचारासाठी जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशेकर यांच्या म्हणण्यानुसार, टिटवाळा परिसराची लोकसंख्या पाच ते सहा लाखांच्या घरात पोहोचली असून प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरामुळे दररोज हजारो भाविक या परिसरात येतात. गोवेली ग्रामीण रुग्णालयाचा सर्वांगीण विकास झाल्यास कल्याण व मुरबाड तालुक्यासह सुमारे २०० हून अधिक गावांतील लाखो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकतात.

शासनाने या रुग्णालयात मल्टीस्पेशालिटी सेवा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर, २४ तास आपत्कालीन सेवा, आयसीयू, माता-बाल रुग्ण विभाग, निदान केंद्र आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये, यासाठी गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे आधुनिक आरोग्य केंद्रात रूपांतर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

याबाबत विजय (भाऊ) देशेकर म्हणाले, “आरोग्य सेवा ही सर्वात मोठी मानवसेवा आहे. शासनाने पुढाकार घेऊन गोवेली ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट करावा. मात्र ते शक्य नसेल तर श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाला संधी द्यावी. लोकसहभाग आणि समाजाच्या मदतीतून हे रुग्णालय आदर्श पद्धतीने विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचा उद्देश नफा कमावणे नसून सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *