मोठा दिलासा! ‘अ’ प्रभागातील पाणीपुरवठा बंद राहणार नाही; केडीएमसीने शटडाऊन रद्द केला

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) पाणीपुरवठा विभागाने शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी मोहीली येथील स्मशानभूमीजवळील मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीसाठी जाहीर केलेला शटडाऊन अखेर रद्द केला आहे. त्यामुळे ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील नागरिकांचा पाणीपुरवठा पूर्वनियोजित वेळेनुसार सुरळीत सुरू राहणार असून, दिवसभर पाणी बंद राहणार नसल्याचा मोठा दिलासा नागरिकांना मिळाला आहे.

यापूर्वी मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तातडीचा शटडाऊन घेण्याची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ‘अ’ प्रभागातील सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचेही कळविण्यात आले होते. मात्र, उपअभियंता, पाणीपुरवठा, ‘अ’ प्रभाग क्षेत्र कार्यालय यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नियोजित शटडाऊन रद्द करण्यात आला असून नागरिकांना पाणीपुरवठ्याची कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवण्याची घाई किंवा चिंता करण्याची आवश्यकता नसून, शुक्रवारी नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

नगरसेवक बंदेश नारायण जाधव यांची प्रतिक्रिया

“महापालिकेने नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने नियोजित शटडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचा नियमित पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. नागरिकांनी  अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे,” असे आवाहन प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक बंदेश नारायण जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *