टिटवाळा, प्रतिनिधी : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी कृतीतून व्यक्त करण्याची संधी असते, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले ते युवासेना सचिव (कल्याण शहर) तथा राजे ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते महेश एगडे यांनी. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत शिक्षणाला प्रोत्साहन दिले, तर वांगणी येथील किनारा मतिमंद आश्रमात अन्नदान करून समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.
रुंदा, म्हसफळ, आंबिवली आणि चिंचवली येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, छत्र्या आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने साहित्य स्वीकारत महेश एगडे यांचे आभार मानले.
यानंतर वांगणी येथील किनारा मतिमंद आश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. आश्रमातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांना प्रेमाने भोजन देण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि समाधानाचा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला. समाजातील दुर्लक्षित घटकांनाही आपलेपणाची जाणीव करून देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
महेश एगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजे ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहेत. शिक्षण, आरोग्य, रक्तदान, आपत्तीग्रस्तांना मदत, अन्नदान आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी निस्वार्थ भावनेने योगदान दिले आहे. समाजसेवा ही प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजाचे ऋण फेडण्याची भावना आहे, या विचारातून ते सातत्याने कार्यरत आहेत.
राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या प्रामाणिक, अभ्यासू आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे स्वतंत्र अशी विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता, तरुणांना सोबत घेऊन विधायक उपक्रम राबविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात.
या उपक्रमासाठी स्थानिक शिक्षक, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, राजे ग्रुपचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी महेश एगडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाला दिलेला हा संदेश प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
याच दिवशी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही महेश एगडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छापत्र पाठविले असून, समाजकल्याण, राष्ट्रविकास तसेच धार्मिक व आध्यात्मिक उन्नतीचे कार्य त्यांच्या हस्ते सातत्याने घडत राहावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
समाजसेवा ही केवळ जबाबदारी नसून ती एक संस्कारमूल्य आहे, याचा प्रत्यय महेश एगडे यांच्या या उपक्रमातून पुन्हा एकदा आला. वाढदिवसाच्या निमित्ताने शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि आश्रमातील विशेष मुलांसोबत आनंद वाटून घेणे, हीच त्यांच्या वाढदिवसाची सर्वात मोठी आणि अर्थपूर्ण भेट ठरली.














Leave a Reply