टिटवाळा : अजय शेलार
टिटवाळा रेल्वे स्टेशन ते निमकर नाका या संपूर्ण बाजारपेठ परिसरात अवैध दुचाकी पार्किंग, अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त वाहतूक यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या या समस्येमुळे वाहनचालक, रिक्षाचालक तसेच पादचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, परिसरात सतत वाहतूक कोंडीचे चित्र दिसत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा अनियंत्रितपणे उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकींमुळे रस्त्यांची रुंदी कमी होत आहे. परिणामी, वाहतूक सुरळीत न राहता वारंवार कोंडी निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक बंदेश जाधव यांनी हा विषय केडीएमसी महासभेत उपस्थित करत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली आहे. मुरबाडचे पोलीस उपअधीक्षक अनिल लाड तसेच कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांची भेट घेऊन अवैध पार्किंगवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मात्र, नागरिकांनी या मुद्द्यासोबतच आणखी एक गंभीर समस्या पुढे आणली आहे. बाजारपेठेतील फुटपाथ पूर्णपणे अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापले असून, पादचाऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, प्रशासनाच्या कारवाया केवळ तात्पुरत्या ठरत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. कारवाईनंतर काही दिवसांतच परिस्थिती पूर्ववत होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे काही फेरीवाले आता नागरिकांवरच दबाव टाकत असून, वाद घालत थेट धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. गायत्री धाम परिसरात एका अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्याने नागरिकाला उघडपणे धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच, गणेश मंदिर रोड परिसरात व्यावसायिक वाहनचालकाने नागरिकाला “बाईक बाजूला घे, नाहीतर धडक देईन” अशी धमकी दिल्याची तक्रार जनताहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे यांनी केली आहे.
या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली असून, सार्वजनिक रस्त्यावर व्यवसाय करण्यास त्याला परवानगी कशा नियमांनुसार देण्यात आली याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याचबरोबर उघड्यावर सुरू असलेल्या अन्नविक्रीबाबत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “फुटपाथ नागरिकांसाठी असूनही त्यांचा वापर करता येत नाही, उलट धमक्या सहन कराव्या लागतात, तर न्याय कोणाकडे मागायचा?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ आणि ठोस कारवाई करून अवैध पार्किंग, फेरीवाले आणि बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा जनताहित फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.














Leave a Reply