फूटपाथवर दुकानांचे साहित्य, लोखंडी जाळ्या आणि दुचाकी; त्यात फेरीवाल्यांचा विळखा, पादचाऱ्यांसाठी चालणेही झाले कठीण
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मोहम्मद अली चौक परिसरातून पायी प्रवास करणे नागरिकांसाठी अक्षरशः ‘तारेवरची कसरत’ ठरत आहे. पादचाऱ्यांसाठी असलेल्या फूटपाथवर काही दुकानदारांनी साहित्य ठेवले असून, दुकानांसमोर लोखंडी जाळ्या, पुतळे आणि इतर वस्तू मांडण्यात आल्या आहेत. त्यातच लगतचे दुचाकी पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसर हा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भागांपैकी एक आहे. दररोज हजारो प्रवासी या परिसरातून ये-जा करतात. मात्र स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. एका बाजूला फूटपाथवरील अतिक्रमण, दुसरीकडे फेरीवाले आणि रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांची दमछाक होत आहे.
या मार्गावरील काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील फूटपाथवर लोखंडी जाळ्या आणि साहित्य ठेवल्याचे दिसून येते. अशोक फूटवेअर या दुकानासमोरील फूटपाथवर कार्पेट पसरविण्यात आले आहे. काही ठिकाणी दुकानांतील कपड्यांचे अथवा वस्तूंचे प्रदर्शन करणारे पुतळेही फूटपाथवर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मूळतः पादचाऱ्यांसाठी असलेली जागा आणखी अरुंद झाली आहे.
फूटपाथच्या लगत दुचाकींचे पार्किंग आणि त्यापुढे फेरीवाल्यांची गर्दी असल्याने नागरिकांना अनेकदा मुख्य रस्त्यावर उतरून चालावे लागत आहे. आधीच वाहनांची मोठी वर्दळ आणि वाहतूक कोंडी असताना पादचाऱ्यांना वाहनांमधून वाट काढावी लागत असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे.
हा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘क’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत येतो. अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी दोन पथकप्रमुख असतानाही स्टेशन परिसरातील फेरीवाले आणि फूटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या अधिकारी आणि कर्मचारी एसआयआरच्या कामात व्यस्त असल्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची चर्चा परिसरात आहे. याचा फायदा घेत फेरीवाले उपलब्ध जागेत आपले बस्तान मांडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहराच्या मध्यवर्ती भागातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे फूटपाथ नेमका पादचाऱ्यांसाठी आहे की व्यावसायिक वापरासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत आणि फेरीवाल्यांबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.













Leave a Reply