टिटवाळा : टिटवाळा येथील मार थोमा विद्यापीठाच्या सीबीएसई शाळेत जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनाचे तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे आणि निरोगी, सुदृढ व व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देणे हा होता.
या निमित्ताने सर्व इयत्तांसाठी पोस्टर निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली. इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “मोबाईलला नकार द्या”, तर इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “अंमली पदार्थांना नकार द्या” हा विषय देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आकर्षक, कल्पक आणि प्रभावी पोस्टर्स साकारली. त्यांच्या कलाकृतींमधून व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना व्यसनांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच निरोगी सवयी अंगीकारण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी व्यसनांपासून दूर राहण्याची आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. हा उपक्रम माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










Leave a Reply