तलासरी : प्रतिनिधी
तलासरी तालुक्यातील वडवली (ओझरपाडा) येथील ग्रामस्थांनी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वापरात असलेला पाणंद रस्ता एका व्यक्तीने तार कुंपण करून अडविल्याचा आरोप करत तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. हा रस्ता तातडीने मोकळा करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तक्रारीनुसार, वडवली (ओझरपाडा) येथील रहिवासी अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यापासून घर, शेत तसेच विहिरीपर्यंत जाण्यासाठी या पाणंद रस्त्याचा वापर करत आहेत. याच मार्गाने शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच आजारी व्यक्तींनाही ये-जा करावी लागते.
मात्र, डोंगरीपाडा येथील निलेश लक्ष्मण शनवार यांनी संबंधित परिसरातील जमीन खरेदी करून जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण केले व रस्त्यालगत तार कुंपण उभारून पाणंद रस्ता बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शेती, विहीर, शाळा तसेच दवाखान्यात जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीशी चर्चा करून रस्ता खुला करण्याची विनंती केली असता, “जमीन माझ्या मालकीची आहे, मुख्य रस्त्याने जा,” असे सांगत धमकी दिल्याचा तसेच रस्ता मोकळा करण्यास सांगणाऱ्यांवर पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित जागेची पाहणी करून अनेक वर्षांपासून वापरात असलेला पाणंद रस्ता तात्काळ मोकळा करून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार, तलासरी यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जातून केली आहे. तसेच या अर्जाची प्रत जिल्हाधिकारी, पालघर यांनाही देण्यात आली आहे.










Leave a Reply