टिटवाळ्यात संभाव्य पूरस्थिती; मनसेचे अग्निशमन विभागाला निवेदन, बचाव यंत्रणा तात्काळ सज्ज करण्याची मागणी

टिटवाळा, प्रतिनिधी : टिटवाळा शहर, मांडा परिसर तसेच काळू नदीच्या वाढत्या जलपातळीमुळे संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टिटवाळा अग्निशमन केंद्राच्या प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी आपत्कालीन बचाव यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात मुसळधार पावसामुळे टिटवाळा, मांडा परिसर आणि काळू नदीलगतच्या सखल भागांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूरस्थिती तीव्र झाल्यास नागरिक अडकणे, घरे व दुकाने पाण्याखाली जाणे, विद्युत अपघात, झाडे व भिंती कोसळणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

मनसेने तात्पुरत्या स्वरूपात प्रशिक्षित जल-बचाव पथके, मोटारचलित व इन्फ्लेटेबल रेस्क्यू बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, बचाव दोरखंड, उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप, पोर्टेबल सर्च लाईट, जनरेटर, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, फिरते वैद्यकीय पथक, नियंत्रण कक्ष आणि इतर आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच काळू नदीच्या जलपातळीवर सातत्याने देखरेख ठेवून धोक्याच्या सूचना वेळेवर नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे आणि सर्व संबंधित शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचावकार्य राबवावे, अशीही भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे (उच्च न्यायालयाचे वकील तथा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना) यांनी सादर केले. यावेळी राम भोईर (महाराष्ट्र सैनिक), दिलीप पूनमचंद राठोड (विशेष कार्यकारी अधिकारी तथा महाराष्ट्र सैनिक), ॲड. गिरीश तसेच ॲड. महेश गायकवाड (उच्च न्यायालयाचे वकील व भारत सरकार मान्यताप्राप्त नोटरी) उपस्थित होते.

सदर निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास दादा भोईर आणि उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोय यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले असून, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *