विद्यार्थी, महिला व कामगारांना दिलासा; समाजोपयोगी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
निलेश कासट (पालघर )
घे भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून कासा, चारोटी तसेच डहाणू तालुक्यातील गरजू नागरिक, महिला, कामगार आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राबविण्यात आलेल्या सायकल वितरण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत बुधवारी आणखी २०० गरजू लाभार्थ्यांना सायकलींचे यशस्वी वितरण करण्यात आले. शिक्षण, स्वावलंबन आणि दैनंदिन प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने घे भरारी फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील गरजू घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या सायकल योजनेमुळे अनेक विद्यार्थी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या समाजहिताच्या कार्यामागे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांची जनकल्याणाची दूरदृष्टी, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि प्रेरणादायी कार्यपद्धती हेच प्रमुख प्रेरणास्थान राहिले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी सातत्याने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या उपक्रमाला यशस्वी स्वरूप प्राप्त करून देण्यात घे भरारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा कविता संखे यांचे विशेष योगदान लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम अधिकाधिक गरजूंंपर्यंत पोहोचत आहे. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी डॉ. योगेश सुभाष बन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष पालघर जिल्हा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या समन्वयामुळे आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास जाऊ शकला. “प्रत्येक घरात सायकल, प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य” या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करत घे भरारी फाऊंडेशन भविष्यातही समाजातील गरजू घटकांसाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविणार असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.















Leave a Reply