टिटवाळा (प्रतिनिधी) : अजय शेलार
टिटवाळा येथील साई आश्रय सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य पालखी व भंडारा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंडळाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या विशेष सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने साईभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या पूजनाने व आरतीने झाली. त्यानंतर साईनामाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण परिसर ‘शिर्डीच्या साईनाथ महाराज की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रमात हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या गेल्या २५ वर्षांतील सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्याचा आढावाही यावेळी उपस्थितांसमोर मांडण्यात आला.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत समाजसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम जपणाऱ्या साई आश्रय सेवा मंडळाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा अविस्मरणीय सोहळा ठरला.











Leave a Reply