जनताहितच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; टिटवाळा पश्चिमेतील वासुंद्री रोडवरील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
टिटवाळा प्रतिनिधी : टिटवाळा पश्चिम येथील वासुंद्री रोडवरून रिजन्सी सर्वम ब्रिजकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता, तर पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे परिसरात अपघाताचा धोका वाढला होता.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनताहित फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित केडीएमसी अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने, पत्रव्यवहार, दूरध्वनीद्वारे संपर्क तसेच माध्यमांच्या माध्यमातून हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर ९ जुलै रोजी दिलेल्या माध्यमांतील मुलाखतीत रितेश प्रकाश कांबळे यांनी केडीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना थेट आव्हान देत, “वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि कॉल करूनही काम होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही,” असे वक्तव्य केले होते.
या भूमिकेनंतर आज प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या रस्त्यावर खडीचा पहिला थर टाकण्यात आला असून, केडीएमसी ए वॉर्डचे मुकादम कृष्ण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच दुसरा थर टाकून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रितेश प्रकाश कांबळे म्हणाले, “काम सुरू झाल्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र हे काम दर्जेदार, टिकाऊ आणि नियमानुसार पूर्ण झाले पाहिजे. जर निकृष्ट दर्जाचे काम झाले किंवा काम अर्धवट सोडण्यात आले, तर कायद्याचे पालन करून नागरिकांच्या सहकार्याने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.”
रितेश प्रकाश कांबळे हे जनताहित फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांसह पक्षी संवर्धन, निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण तसेच विविध जनहिताच्या विषयांवर सातत्याने काम करत असतात. त्यांनी पुढे सांगितले की, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जनताहित फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा योग्य त्या ठिकाणी वृक्षारोपण करून परिसर अधिक हिरवागार करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनीही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण व्हावे, तसेच भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाने नियमित देखभाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.










Leave a Reply