वाढीव वीजबिल व मीटर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरणचा ग्राहक मेळावा; टिटवाळ्यातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

टिटवाळा, दि. १० जुलै : वाढीव वीजबिले, मीटरमधील त्रुटी तसेच वीजसेवांशी संबंधित विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या टिटवाळा उपविभागाच्या वतीने विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टिटवाळा उभारणी उपविभागातील सर्व वीज ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घेऊन आपल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.हा ग्राहक मेळावा महावितरण कार्यालय, मधुबन सोसायटीजवळ, मांडा, टिटवाळा येथे आयोजित करण्यात आला असून वाढीव वीजबिल, मीटर रीडिंगमधील विसंगती, नवीन जोडणी, नाव दुरुस्ती, थकबाकी, बिलातील तांत्रिक अडचणी तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित इतर समस्यांवर अधिकाऱ्यांकडून थेट मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.महावितरणने ग्राहकांना मेळाव्यास येताना अलीकडील वीजबिल, ग्राहक क्रमांक आणि संबंधित कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तक्रारींची पडताळणी करून त्यांचे शक्य तितक्या लवकर निराकरण करणे सुलभ होणार आहे.

दरम्यान, वाढीव वीजबिलांच्या तक्रारी अनेक भागांतून समोर येत असल्याने या ग्राहक मेळाव्याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या संदर्भात रितेश कांबळे, अध्यक्ष, जनताहित फाऊंडेशन यांनीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *