वाढदिवसाचा वेगळा आदर्श; अशोक भोईर यांच्याकडून १४ दु:खग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक मदत

केक-फटाक्यांऐवजी समाजसेवेची वाट; वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी उपक्रम…

पालघर : निलेश कासट

आजच्या काळात वाढदिवस म्हणजे केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी, सत्कार समारंभ आणि मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च अशी प्रथा रूढ होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी मात्र आपल्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्शवत संदेश दिला आहे. जल्लोषावर खर्च करण्याऐवजी त्यांनी संकटग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेत वाढदिवसाला समाजोपयोगी स्वरूप दिले.
अलीकडेच धानिवरी परिसरात झालेल्या भीषण अपघातामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तींच्या निधनामुळे आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलेल्या या कुटुंबांना आधार देण्यासाठी अशोक भोईर यांनी बापुगाव येथील लाखातपाडा परिसराला भेट देत अपघातातील मृतांच्या १४ कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.
या मदत उपक्रमाअंतर्गत तूर डाळ, मसूर डाळ, चना, वाटाणा, चवळी, साखर, खाद्यतेल, साबण, सोनपापडी तसेच अन्य आवश्यक किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले. सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असल्याने संबंधित कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी काही प्रमाणात दिलासा मिळावा आणि त्यांच्या घरातील अन्नधान्याची गरज भागावी, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
याचवेळी उच्च शिक्षण घेणाऱ्या एका गरजू महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे अशोक भोईर यांनी सांगितले.
अशोक भोईर यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. वाढदिवसाचा दिखाऊ उत्सव साजरा करण्याऐवजी गरजू, वंचित आणि संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे, हीच वाढदिवस साजरा करण्याची खरी सार्थकता असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. या उपक्रमावेळी जयवंत काटेला व कैलास माळी उपस्थित होते. तसेच हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर आणि युवा जिल्हाध्यक्ष करण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. उपस्थितांनी अशोक भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आणि भविष्यातही अशाच लोकहिताच्या उपक्रमांची परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *