क्रिकेटप्रेमी युवकांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; ‘एक हात मदतीचा ग्रुप कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चंद्रकांत देसले /शहापूर

शहापूर : तालुक्यातील क्रिकेटप्रेमी युवकांच्या ‘एक हात मदतीचा या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा, वेळोशी येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर तसेच अभ्यासासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
‘एक हात मदतीचा ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे गेली सहा वर्ष तालुक्यातील विविध दुर्गम व आदिवासी वस्त्यांवर जाऊन सातत्याने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा अभ्यासातील उत्साह वाढावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
कार्यक्रमावेळी ग्रुपच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील नागरिकांनीही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी ‘एक हात मदतीचा ग्रुपचे अनेक सदस्य, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या शिक्षकांनी व ग्रामस्थांनी ग्रुपच्या सदस्यांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविणाऱ्या शहापूर तालुक्यातील क्रिकेटप्रेमी युवकांचे तालुक्यातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *