दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ खडवलीत वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; व्यापारी व रिक्षा संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा

टिटवाळा , प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत खडवली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. कल्याण तालुका ग्रामीण उपाध्यक्ष सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शांततेत पार पडला.
खडवली पश्चिम येथील साईबाबा मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बहुजन समाजातील नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या बंदला स्थानिक व्यापारी वर्ग आणि रिक्षा संघटनांनीही स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला. अनेक व्यापाऱ्यांनी काही काळ दुकाने बंद ठेवली, तर रिक्षा चालकांनीही वाहतूक सेवा काही वेळेसाठी बंद ठेवून आंदोलनाला सहकार्य केले. त्यामुळे परिसरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण तालुका ग्रामीण उपाध्यक्ष सुनील भोईर, चिंतामण सोनावणे, विकी जाधव, दशरथ पांडव, आकाश सावंत, प्रशांत जाधव, अक्षय पाटील, आकाश बोबडे, एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय भोईर, सत्यवान भोईर, ज्ञानेश्वर भोईर, विशाल भोईर आदी उपस्थित होते. तसेच व्यापारी मंडळाचे अध्यक्ष किरण मोरे, रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ मोरे आणि नाभिक समाजाचे अध्यक्ष वैभव सावंत यांनी आंदोलनाला सक्रिय सहकार्य केले.
मोर्चा शांततेत व कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडण्यासाठी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय डावरे, फौजदार प्रदीप कदम तसेच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यांच्या सहकार्यामुळे मोर्चा सुरळीत आणि शांततेत पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *