विक्रमगड सेवा संस्था मतदारसंघातून ऐतिहासिक विजय; ओबीसी राखीव मतदारसंघातही बलाढ्य पॅनेलला दिली कडवी टक्कर, सहकार क्षेत्रात वाढत्या जनाधाराची जोरदार चर्चा
ठाणे : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ च्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते आणि ‘जिजाऊ’ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आपल्या नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत सहकार क्षेत्रात मोठी राजकीय छाप उमटवली आहे. विक्रमगड तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवत संचालकपदावर निवड निश्चित केली. त्याचबरोबर जिल्हास्तरीय ओबीसी राखीव मतदारसंघात प्रस्थापितांच्या बलाढ्य पॅनेलविरुद्ध अत्यंत अटीतटीची लढत देत अवघ्या १०० मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र या निकालामुळे प्रस्थापितांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा संपूर्ण ठाणे-पालघर सहकार क्षेत्रात रंगली आहे.
या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही मोठ्या राजकीय किंवा प्रस्थापित पॅनेलचा आधार नसतानाही निलेश सांबरे यांनी उभा केलेला जनाधार. निवडणुकीपूर्वी ज्यांनी त्यांना आपल्या पॅनेलमध्ये स्थान देण्यास नकार दिला होता, त्याच प्रस्थापितांना या निकालातून सांबरे यांच्या प्रभावाची आणि सभासदांमधील लोकप्रियतेची प्रचिती आल्याची चर्चा सुरू आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवत त्यांनी हजारो सभासदांचा विश्वास संपादन केला असून, त्यांचे नेतृत्व सहकार क्षेत्रात अधिक प्रभावी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन दशकांपासून निलेश सांबरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सहकार क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्याविषयी सभासदांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, या निवडणुकीत त्याचेच रूपांतर मतांमध्ये झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
विजयानंतर ठाण्यात निलेश सांबरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत कार्यकर्ते, पदाधिकारी, सभासद, हितचिंतक आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. “हा विजय केवळ माझा नसून गेल्या वीस वर्षांपासून जिजाऊ परिवारामार्फत केलेल्या प्रामाणिक समाजसेवेचा आणि सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचा आहे,” असे सांगत त्यांनी सर्व मतदार, सभासद आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी बोलताना निलेश सांबरे म्हणाले, “हा सामाजिक कार्यावर जनतेने ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शक, प्रामाणिक आणि सभासदहिताचे काम यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवणार असून, सर्वसामान्य सभासदांचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, निलेश सांबरे हे केवळ एक उमेदवार नसून सहकार क्षेत्रातील प्रभावी, वाढता जनाधार असलेले आणि प्रस्थापितांना थेट आव्हान देणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. आगामी काळात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सहकार तसेच स्थानिक राजकारणात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Leave a Reply