ओळखपत्र, गणवेश आणि कार्यालयीन वेळेबाबत कठोर परिपत्रक; सात दिवसांत बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश
टिटवाळा : पंचायत समिती कल्याण कार्यालयातील कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या, अनेकांकडून बायोमेट्रिक हजेरीची नोंद केली जात नसल्याच्या तसेच काही अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना शासकीय ओळखपत्र परिधान करीत नसल्याच्या तक्रारीनंतर पंचायत समिती प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल कुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पंचायत समिती कल्याणने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळ, बायोमेट्रिक उपस्थिती, ओळखपत्र आणि गणवेशाबाबत स्पष्ट व कडक निर्देश जारी केले आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध नियमोचित प्रशासकीय तसेच शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पंचायत समिती कल्याणच्या कार्यालयाकडून २५ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात विशाल कुरकुटे यांनी यापूर्वी दिलेल्या निवेदनाचा तसेच १४ ऑगस्ट २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान केलेल्या प्रत्यक्ष तक्रारीचा उल्लेख करण्यात आला आहे. कुरकुटे यांनी शासकीय कर्मचारी गणवेश व ओळखपत्र परिधान करीत नसल्याचे आणि सर्व कर्मचारी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या तक्रारीनंतर प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली आहे. परिपत्रकानुसार, पंचायत समिती कार्यालयात बहुतांश अधिकारी व कर्मचारी उशिराने येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. वर्ग-४ संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी कार्यालयीन वेळ निश्चित असून वर्ग-३ संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कार्यालयीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या या कार्यालयीन वेळेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमोचित प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कार्यालयीन उपस्थितीच्या नोंदीबाबतही प्रशासनाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. पंचायत समितीअंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक मशीनवर उपस्थितीची नोंद करणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र काही कर्मचारी तसेच काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अद्याप बायोमेट्रिक प्रणालीवर नोंदणीच केलेली नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कार्यालय प्रमुखांनी परिपत्रक मिळताच सात दिवसांच्या आत आपल्या अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण करावी आणि दररोजची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदवली जाईल याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन बायोमेट्रिक उपस्थिती अहवालाच्या आधारे काढण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण निर्णयही या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आला आहे. बायोमेट्रिक अहवालात एखादा कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आल्यास संबंधित खातेप्रमुखांनी प्रथम गैरहजेरीची खातरजमा करावी आणि त्यानुसार वेतन अदायगीची कार्यवाही करावी. कर्मचारी अनुपस्थित असतानाही वेतन अदा करण्यात आल्यास त्यासाठी संबंधित खातेप्रमुखास जबाबदार धरले जाईल, अशी गंभीर ताकीद प्रशासनाने दिली आहे.
शासकीय ओळखपत्राबाबतही पंचायत समितीने शिस्तीची सक्ती केली आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य कालावधीत शासकीय सेवेतील ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या पूर्वीच्या निर्देशानुसार कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना ओळखपत्राचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे अशी बाब आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश संबंधित खातेप्रमुखांना देण्यात आले आहेत.
वर्ग-४ संवर्गातील वाहनचालक आणि शिपाई कर्मचाऱ्यांसाठी गणवेशाबाबतही कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना विहित केलेला गणवेश कर्तव्यावर असताना परिधान करणे आवश्यक आहे. गणवेश न घातल्याचे आढळल्यास मासिक वेतनातील धुलाई भत्ता बंद करण्यासह प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक खातेप्रमुखाने आपल्या अधिनस्त वाहनचालक आणि शिपाई कर्मचाऱ्यांना याबाबत लेखी सूचना देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वीही पंचायत समिती कल्याण प्रशासनाने कार्यालयीन कामकाज आणि उपस्थितीबाबत परिपत्रके काढून सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही बहुतांश कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे. दिलेल्या सूचनांनुसार कामकाज होत नसल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा सर्व संबंधितांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून, यापुढेही सूचनांचे पालन न झाल्यास संबंधितांविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल. या परिपत्रकाची प्रत पंचायत समिती कल्याणमधील सर्व तालुकास्तरीय खातेप्रमुखांना पाठविण्यात आली असून, त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी तसेच वर्ग-४ कर्मचाऱ्यांकडून आवश्यक कार्यवाही करून घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद ठाणे येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. तक्रारदार विशाल शां. कुरकुटे यांनाही या परिपत्रकाची माहिती देण्यात आली आहे.
एकूणच, कार्यालयीन शिस्त, वेळेचे पालन, बायोमेट्रिक उपस्थिती, शासकीय ओळखपत्र आणि गणवेश या मूलभूत बाबींमध्ये होत असलेल्या हलगर्जीपणावर पंचायत समिती कल्याण प्रशासनाने आता कडक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष तक्रारीनंतर प्रशासनाने पुन्हा परिपत्रक काढत नियमांची आठवण करून दिली असून, आता या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते आणि नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर खरोखर कारवाई केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













Leave a Reply