टिटवाळ्यात नागरिकांवर स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ!

गणेश मंदिराकडून गोवेलीकडे जाणाऱ्या मार्गावरील जकात परिसरात रस्त्याची दयनीय अवस्था; दुचाकी घसरून लहान-मोठ्या अपघातांच्या घटना

टिटवाळा: अजय शेलार 

टिटवाळा पूर्वेकडील गणेश मंदिराकडून गोवेलीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील जकात परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती होण्याची प्रतीक्षा करत बसण्याऐवजी अखेर स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असताना नागरिकांनाच हातात फावडे घेऊन खड्डे बुजवावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

गणेश मंदिर परिसरातून गोवेलीकडे जाणारा हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज दुचाकीस्वार, रिक्षा, चारचाकी वाहने तसेच पादचारी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र जकात परिसरातील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असून, खड्ड्यात गाडी गेल्यानंतर वाहन स्लीप होऊन लहान-मोठ्या दुर्घटना घडल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. अचानक खड्डा समोर आल्याने दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण होते. त्यातच रस्त्याच्या कडेला उखडलेला भाग आणि साचलेला माती-मुरूम यामुळे घसरून अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या एका नागरिकाने अखेर स्वतःच पुढाकार घेत खड्ड्यांमध्ये माती-मुरूम टाकून ते भरून काढण्याचा प्रयत्न केला. हातात फावडे घेऊन नागरिक स्वतः रस्त्याची डागडुजी करत असल्याचे दृश्य परिसरातील प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. नागरिक कर भरतात, विविध प्रकारचे शुल्क भरतात, मात्र मूलभूत सुविधा म्हणून सुरक्षित रस्ता मिळवण्यासाठी त्यांनाच स्वखर्चाने काम करावे लागत असेल, तर ही परिस्थिती गंभीर असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरील खड्ड्यांमुळे केवळ वाहनांचे नुकसान होत नाही, तर प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो. रस्त्यावरील खराब भाग स्पष्ट दिसत नसल्याने अचानक ब्रेक लावावे लागतात आणि मागून येणाऱ्या वाहनांनाही अपघाताचा धोका निर्माण होतो. दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

एकीकडे विकासकामांचे दावे केले जात असताना दुसरीकडे नागरिकांना स्वतःच्या पैशातून आणि श्रमातून खड्डे भरावे लागत असल्याचे वास्तव टिटवाळ्यातील जकात परिसरात दिसत आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित प्रशासनाने या मार्गाची पाहणी करावी, खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि पुन्हा अशा धोकादायक परिस्थितीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *