टिटवाळा : अजय शेलार
नारळी पौर्णिमेनिमित्त मांडा कोळीवाडा येथे ग्रामस्थ मंडळ, मांडा कोळीवाडा यांच्या विद्यमाने आयोजित उत्सव गुरुवारी अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी आणि पारंपरिक जल्लोषात पार पडला. सकाळपासूनच संपूर्ण कोळीवाड्यात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखांमध्ये महिला, पुरुष आणि लहानग्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या, सोन्याचे दागिने आणि आकर्षक अलंकार परिधान करून लेझीम तसेच ढोल-ताशांच्या गजरात कोळी नृत्य सादर केले. या पारंपरिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
ढोल-ताशांचा दणदणाट आणि कोळी गीतांच्या लाईव्ह कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला. उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते लोकप्रिय लाईव्ह ऑर्केस्ट्रा. या कार्यक्रमात कोळी गीते आणि मराठी लोकगीतांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. गाण्यांच्या तालावर तरुणाईसोबतच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे ठेका धरला.
यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली. नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक प्रथेनुसार समुद्रदेवतेची पूजा करण्यात आली. कोळी समाजासाठी हा दिवस केवळ धार्मिक उत्सव नसून भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यावेळी मच्छीमार बांधवांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गावाच्या सुख-समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
ग्रामस्थ मंडळाच्या उत्तम नियोजनामुळे आणि गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नारळी पौर्णिमेचा हा उत्सव संस्मरणीय ठरला. पारंपरिक संस्कृती, एकता आणि आनंदाचा संगम असलेल्या या सोहळ्याने मांडा कोळीवाड्यातील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. समुद्राच्या लाटांप्रमाणेच मांडा कोळीवाड्यात उसळलेला आनंद आणि एकतेचा हा जल्लोष उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील. अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या . अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या .















Leave a Reply