काम होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा;
अन्यथा नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका – जनताहित फाउंडेशन ट्रस्ट.संस्थापक अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे
टिटवाळा प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील मांडा-टिटवाळा पश्चिम येथील वासुंद्री रोड (गणेश प्रतिमा बिल्डिंग ते रेजन्सी सर्वम बिल्डिंग) हा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा लेखी निवेदने, पत्रव्यवहार, व्हॉट्सअॅप संदेश आणि दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा गंभीर आरोप जनताहित फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे यांनी केला आहे. रितेश कांबळे म्हणाले, “ज्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांची कामे होत नाहीत, वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नाही, अशा अधिकाऱ्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी जनतेचा वेळ व विश्वास वाया घालवण्यापेक्षा राजीनामा द्यावा. अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी असतात, केवळ खुर्ची सांभाळण्यासाठी नाहीत.”
ते पुढे म्हणाले, “आज डिजिटल इंडियाचा काळ आहे. एखाद्या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष किंवा सामान्य नागरिक समस्येसंदर्भात अधिकाऱ्यांना फोन करत असेल, तर तो कॉल उचलणे, संदेशाला उत्तर देणे आणि नागरिकांचे म्हणणे ऐकणे हे त्यांचे कर्तव्य आहे. वारंवार कॉल आणि व्हॉट्सअॅप संदेश करूनही प्रतिसाद मिळत नसेल, तर अशा अधिकाऱ्यांचा नागरिकांना काय उपयोग?” यावेळी त्यांनी नागरिकांच्या मनातील प्रश्नही उपस्थित केला. “नागरिक नियमितपणे रोड टॅक्स भरतात. मग हा पैसा नेमका जातो कुठे? रोड टॅक्स घेतला जातो, पण दर्जेदार आणि सुरक्षित रस्ते का मिळत नाहीत? नागरिकांनी भरलेल्या कराचा उपयोग जर मूलभूत सुविधा देण्यासाठी होत नसेल, तर हा गंभीर चिंतेचा विषय आहे,” असेही कांबळे यांनी स्पष्ट केले.
वासुंद्री रोड हा टिटवाळा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून दररोज हजारो नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मोठमोठे खड्डे, चिखल आणि खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. जनताहित फाउंडेशन ट्रस्टने या प्रश्नासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त, उपआयुक्त, शहर अभियंता, संबंधित विभाग आणि रोड कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे वारंवार लेखी निवेदने व पत्रव्यवहार करून तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांनीही स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “उद्या या रस्त्यावर मोठा अपघात झाला किंवा एखाद्याचा जीव गेला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासन, प्रशासन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि संबंधितअधिकाऱ्यांवर राहील.”जनताहित फाउंडेशन ट्रस्टने प्रशासनाने तात्काळ जागे होऊन या मुख्य रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, निष्क्रिय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी होणारी ही गंभीर खेळ थांबवावा, अशी ठाम मागणी केली आहे.











Leave a Reply