टिटवाळा : टिटवाळा रेल्वे स्थानकातील रखडलेली कामे, वाढती गर्दी आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांच्या प्रश्नांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आवाज दिल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाला हालचाल करावी लागली आहे. अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेल्या मध्यवर्ती पुलाच्या कामाला आता वेग आला असून, स्थानकातील अस्वच्छ आणि दयनीय अवस्थेत असलेले स्वच्छतागृहही आता स्वच्छ व व्यवस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिटवाळा हे झपाट्याने वाढणारे शहर असून रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत स्थानकावर अक्षरशः जीवघेणी परिस्थिती निर्माण होत होती. अपुरा पूल, रखडलेले बांधकाम आणि प्रवाशांसाठी अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा प्रवाशांनी नाराजी व्यक्त करूनही प्रशासनाकडून ठोस हालचाल होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये होती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा विषय आक्रमकपणे उचलून धरत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. स्थानकातील धोकादायक परिस्थिती, पुलाच्या कामातील विलंब आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर मनसेने प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत पुलाचे काम जलद गतीने सुरू केले आहे.
मनसेच्या वतीने सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके, ॲड. महेश गायकवाड आणि इतर महाराष्ट्र सैनिकांनी स्थानक परिसराची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कामाचा दर्जा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रशासनाकडे सूचना केल्या.
पाहणीदरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. पुलाचे काम केवळ वेगात नव्हे तर दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित मुदतीत पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. तसेच टिटवाळा स्थानकातील इतर सुविधांबाबतही भविष्यात पाठपुरावा कायम ठेवला जाईल, असे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, पूर्वी अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये आता मोठा बदल दिसून येत आहे. नियमित साफसफाई, पाण्याची उपलब्धता आणि देखभाल यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अनेक प्रवाशांनी “पहिल्यांदाच प्रशासन प्रत्यक्ष काम करताना दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
“सामान्य प्रवाशांचे प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करता यावा यासाठी मनसेचा संघर्ष यापुढेही सुरू राहील,” अशी ठाम भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.
टिटवाळा रेल्वे स्थानकातील बदलती परिस्थिती पाहता आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळत असून, येत्या काही महिन्यांत स्थानकाचा चेहरामोहराच बदलणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.













Leave a Reply