टिटवाळा : मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत गोवेली उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी NRC-3 (100 केव्ही टाटा-कांबे) ही मुख्य वीजवाहिनी सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने गोवेली उपकेंद्राकडे येणारा विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. २२ केव्ही वीजवाहिनीवरील तारा तुटल्यामुळे गोवेली उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या मांडा, केडीएमसी, फळेगाव, खडवली आणि केडीएमसी-२ या २२ केव्ही वीजवाहिन्यांवरील विद्युत पुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळे या वीजवाहिन्यांवर अवलंबून असलेल्या हजारो घरगुती, व्यावसायिक आणि इतर वीजग्राहकांना काही काळ वीजखंडितीचा सामना करावा लागला.
बिघाडाची माहिती मिळताच गोवेली शाखा कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वीजपुरवठा शक्य तितक्या कमी वेळात पूर्ववत करण्याच्या उद्देशाने युद्धपातळीवर तपासणी आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. तपासणीदरम्यान रायता पुलाजवळ उच्चदाब (एचटी) वीजवाहिनीचा जंपर तुटल्याचे निदर्शनास आले. मात्र सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस, परिसरात साचलेले पाणी आणि प्रतिकूल हवामान यामुळे दुरुस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक बनले होते.
अशा कठीण परिस्थितीतही वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. बळीराम खडके आणि श्री. रविंद्र लेंडे यांनी आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत धाडसाचे उदाहरण घालून दिले. जीवाची पर्वा न करता त्यांनी पाण्यातून पोहत घटनास्थळ गाठले आणि तुटलेला एचटी जंपर दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीतही त्यांनी शांतपणे आणि कौशल्याने आवश्यक तांत्रिक दुरुस्ती पूर्ण केली.
या अथक प्रयत्नांमुळे NRC-3 फीडर अल्पावधीत पूर्ववत सुरू करण्यात यश आले आणि गोवेली उपकेंद्राकडे पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर मांडा, केडीएमसी, फळेगाव, खडवली आणि केडीएमसी-२ या सर्व वीजवाहिन्यांवरील पुरवठाही टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे हजारो वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल हवामान, मुसळधार पाऊस आणि जीवाला धोका असतानाही दाखविलेली तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा ही कौतुकास्पद ठरली आहे. नैसर्गिक संकटाच्या काळातही अखंडित वीजसेवा देण्यासाठी कार्यरत असलेले महावितरणचे कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जबाबदारीपासून मागे हटत नाहीत, याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेतून आली. संबंधित तंत्रज्ञांच्या धाडसी कामगिरीमुळे मोठा संभाव्य वीजपुरवठा खंडित होण्याचा कालावधी टळला आणि हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा अल्पावधीत सुरळीत करण्यात यश आले.
पहा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/3zZoIs8Ug_w?si=4PDc14VzC8stnxsU
https://youtube.com/shorts/dsVdRMR2EIo?si=E0AES53bl4zSzcPM













Leave a Reply