टिटवाळा पूर्वेत नागरिकांची चिखलातून जीवघेणी कसरत! SBI बँक–अमृतसिद्धी मार्गाची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला

टिटवाळा : अजय शेलार 

टिटवाळा पूर्व येथील SBI बँकेजवळून अमृतसिद्धी परिसराकडे जाणारा प्रमुख मार्ग सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विठ्ठलधाम सोसायटीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू, रेती व माती साचली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलाच्या दलदलीत बदलला असून वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून दुचाकी चालवणे धोकादायक बनले आहे. नुकतीच एका स्कुटीस्वाराची गाडी घसरल्याची घटना घडली असून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक दुचाकी चालकांची वाहने चिखलामुळे स्लिप होत असल्याने अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर इतका चिखल साचला आहे की नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे.
टिटवाळा रेल्वे स्टेशनपासून अमृतसिद्धी परिसराकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असून येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. शालेय विद्यार्थी, शाळेच्या बसेस, रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
याशिवाय SBI बँकेसमोर वाढलेल्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. अनेकजण सकाळी कामावर जाताना आपली दुचाकी व चारचाकी वाहने बँकेसमोर पार्क करून दिवसभर तशीच ठेवतात व संध्याकाळी परत घेऊन जातात. परिणामी रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहतूक सुरळीतपणे होण्यास अडथळा निर्माण होत आहे. पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेला चालण्यासाठी जागा राहत नसल्याने त्यांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित यंत्रणांकडे तक्रारी केल्याचा दावा केला असून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. पुनर्विकासाचे काम सुरू असताना बांधकाम साहित्य रस्त्यावर पसरणार नाही याची काळजी घेणे संबंधित विकासकाची जबाबदारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC), वाहतूक विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्यावरील चिखल हटवावा, रस्त्याची दुरुस्ती करावी, बांधकाम साहित्य रस्त्यावर येण्यास प्रतिबंध करावा तसेच SBI बँकेसमोरील अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. “प्रशासनाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर एखादा मोठा अपघात घडल्याशिवाय जाग येणार नाही का?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. टिटवाळा पूर्वेतील या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *